गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी नातवानेच आजीच्या घरात टाकला डल्ला; सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीचा गणेशपेठ पोलिसांकडून पर्दाफाश

नागपूर : नागपूर शहरातून नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या आजीने नातवाला लहानाचे मोठे केले, त्याच नातवाने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी आणि वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. गणेशपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली आहे.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 64 वर्षीय सुभदा किशोर मस्ते या मेयो रुग्णालयातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांची चौकशी करण्यात आली. यावेळी तक्रारदार महिलेचाच नातू प्रदीप मस्ते याच्यावर संशय गेला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
आरोपीने सांगितले की, गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी तसेच स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी पैशांची गरज असल्याने त्याने आजीच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरली. चोरीनंतर त्याने सोन्याचे दागिने उमरेड येथील एका सोनाराकडे विकल्याचेही तपासात समोर आले.
यानंतर पोलिसांनी संबंधित सोनाराकडे जाऊन चोरीतील दागिने जप्त केले. तसेच चोरीस गेलेल्या इतर मालमत्तेचाही शोध घेत ती हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
या संपूर्ण कारवाईत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अल्पावधीत आरोपीपर्यंत पोहोचत चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
दरम्यान, पैशांच्या आणि चैनीच्या मोहापायी स्वतःच्या आजीलाच लक्ष्य केल्याची ही घटना नागपुरात चर्चेचा विषय ठरली आहे. विश्वासाच्या नात्यालाच तडा देणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



