GurudevBhaktSanthapLatest NewsMaharashtraTivsaThiyyaAndolan

सोयाबीन पीक विमा परतावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्नच्या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन; शेतकरी आणि गुरुदेव भक्तांचा संताप उसळला

तिवसा : तिवसा तहसील कार्यालयात आज शेतकरी आणि गुरुदेव भक्तांनी जोरदार ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सोयाबीन पीक विम्याचा प्रलंबित परतावा तातडीने मिळावा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी थेट तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला.

सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी यापूर्वीच प्रशासनाला निवेदन देत या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. तसेच ५ जूनपासून उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार आज मोठ्या संख्येने सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि गुरुदेव भक्त तहसील कार्यालयात दाखल झाले.

आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत सोयाबीन पीक विम्याचा परतावा अद्याप मिळालेला नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दुसरीकडे तहसील प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना दिलेल्या पत्रात पीक विमा परताव्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार संबंधित विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आंदोलन काही काळ स्थगित ठेवण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले. मात्र आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली.

दरम्यान, सोयाबीन पीक विमा परतावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देण्याच्या मागणीवरून तिवसा तालुक्यात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या आश्वासनांनंतरही शेतकरी आणि गुरुदेव भक्त समाधानी नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, पीक विमा परताव्याबाबत ठोस निर्णय कधी घेतला जातो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याच्या मागणीबाबत पुढे काय घडामोडी होतात, याकडे तालुक्यासह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button