२२.२१ लाखांच्या कर थकबाकीपोटी मालमत्ता सील; अमरावती महापालिकेची धडक कारवाई

अमरावती : अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेला आणखी वेग दिला असून, राजापेठ परिसरात मोठी कारवाई करत तब्बल २२ लाख २१ हजार १२६ रुपयांची थकबाकी असलेली मालमत्ता सील केली आहे. आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली असून, शहरातील इतर थकबाकीदारांनाही यामुळे स्पष्ट इशारा मिळाला आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, मध्य झोन क्रमांक २ अंतर्गत वार्ड बी-५ मधील मालमत्ता क्रमांक १३९०/१३९०/१ वर अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत होता. संबंधित मालमत्ताधारकाला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच कर भरण्यासाठी अनेकदा सूचना आणि संधी देण्यात आली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही थकबाकीचा भरणा करण्यात आला नाही.
यामुळे महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित मालमत्तेवर सीलिंगची कारवाई केली. शहरातील विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांसाठी मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असल्याने थकबाकीदारांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
ही कारवाई मध्य झोनचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण, निरीक्षक फैयाज खान तसेच वसुली लिपिक सुरज चावरे, स्वप्नील रामसे, धरम बिवाड आणि विशाल ढिक्याव यांनी सहभाग घेतला.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे त्यांनी तातडीने मालमत्ता कराचा भरणा करावा. अन्यथा सीलिंग, जप्ती आणि इतर कायदेशीर कारवाया करण्यात येतील. विशेष वसुली मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असून कोणत्याही थकबाकीदाराला सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या महसुलात वाढ करून शहर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सुरू असलेली ही विशेष मोहीम पुढील काळातही सुरू राहणार आहे. थकीत कर वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.



