amravaticitynewsEducation News

MPSCच्या कारभाराविरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा; आयोग रद्द करण्याची मागणी

दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

अमरावतीमध्ये MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत विराट मोर्चा काढला. दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत आयोग रद्द करण्याची तसेच पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

अमरावतीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयापासून MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विराट मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. पंचवटी चौक, गर्ल्स स्कूल चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.

मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. MPSCच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते, त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडले.

विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरखास्त करून संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

MPSCच्या कारभाराविरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांचा आक्रोश पुन्हा एकदा रस्त्यावर पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली असून, आता शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यावर काय भूमिका घेतात, याकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button