अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड, गांजा-जुगारासह अवैध दारूवरही कारवाई

मोर्शी, दर्यापूर, वरुड, तिवसा व मंगरूळ दस्तगीर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी तसेच अंमली पदार्थ आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी, दर्यापूर, वरुड, तिवसा आणि मंगरूळ दस्तगीर परिसरात विविध ठिकाणी धडक कारवाया करत मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यासोबतच जुगार, गांजा बाळगणे तसेच अवैध देशी दारू वाहतुकीविरोधातही कारवाई करण्यात आली.

मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड
मोर्शी उपविभागात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सलीम खान इब्राहिम खान, रा. सुलतानपुरा, मोर्शी याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता सालबर्डी येथून तसेच एका फरार साक्षीदारासोबत परतवाडा आठवडी बाजारातून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत 50 हजार रुपये आहे.
दर्यापूर परिसरातही पोलिसांनी रोशन विक्रम चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत अमला-दर्यापूर रोड तसेच दर्यापूर येथून मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन मोटारसायकली, किंमत 80 हजार रुपये, जप्त करण्यात आल्या.

याशिवाय दर्यापूर पोलीस ठाण्यात सन 2025 मधील गुन्हा क्रमांक 91/2025 मध्ये आरोपी अनुज मदन धर्मा याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेली 50 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली.
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा
अमरावती ग्रामीण पोलिसांनी वरुड आणि मंगरूळ दस्तगीर परिसरात 52 ताशांच्या पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या इसमांविरुद्धही धडक कारवाई केली.
या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकली असा एकूण 2 लाख 39 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरुड येथील कारवाईत 41 हजार 350 रुपये, तर मंगरूळ दस्तगीर येथील कारवाईत 1 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तिवसा बसस्थानक परिसरात 5 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त
दरम्यान, तिवसा बसस्थानक परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी योगेंद्र उर्फ छोटू गजानन खाडे, रा. कैकाडीपुरा, परतवाडा याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 5 किलो 103 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची अंदाजे किंमत 2 लाख 55 हजार 150 रुपये आहे. यासोबत मोबाईल फोन आणि स्कूल बॅग असा एकूण 2 लाख 65 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध देशी दारू वाहतुकीवरही कारवाई
मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विटाळा तसेच देवनागाव-पूर्णागाव रोड परिसरात विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत 70 बाटल्या देशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 77 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची विशेष मोहीम
अमरावती ग्रामीण जिल्ह्यात चोरी, जुगार, अंमली पदार्थ आणि अवैध दारूविक्रीसह विविध बेकायदेशीर प्रकारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवायांमुळे विविध गुन्ह्यांचा छडा लागला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम (भापोसे) यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री. अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली सर्पोई संतोष गुर्जर, पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे, पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर आणि पोलीस उपनिरीक्षक रोहित कुळकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली.



