citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात कुख्यात घरफोड्या-वाहन चोर गजाआड; ८ गुन्ह्यांचा उलगडा

यशोधरा नगर पोलिसांची मोठी कारवाई; ३ घरफोडी, ५ वाहन चोरीचे गुन्हे उघड, ३ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : नागपुरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या आरोपीला यशोधरा नगर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. पियुष उर्फ गधा दिपक निमजे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून तीन घरफोडी आणि पाच वाहन चोरीचे असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून ३ लाख ४७ हजार २८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यशोधरा नगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी नगर मैदान परिसरात सापळा रचून पियुष निमजेला ताब्यात घेण्यात आलं.

ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडी आणि वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांची माहिती दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

तपासादरम्यान कुंदनलाल गुप्ता नगर, कांजी हाउस आणि धम्मदीप नगर परिसरातील घरफोडीचे गुन्हे, तसेच यशोधरा नगर, हुडकेश्वर, पारडी आणि शांतिनगर परिसरातून चोरी झालेली वाहनं उघडकीस आली आहेत.

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये पल्सर, हिरो एक्स्ट्रीम, स्प्लेंडर, होंडा अ‍ॅक्टिव्हा आणि रॉयल एनफिल्ड बुलेट यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पियुष निमजेवर यापूर्वीही सुमारे २० गुन्हे दाखल आहेत. मागील तीन दिवसांपासून त्याच्या जवळच्या साथीदारांवरही पोलिसांची पाळत ठेवण्यात आली होती.

या कारवाईनंतर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच्या साथीदारांचा आणि चोरीच्या मालाच्या व्यवहाराचा तपासही महत्त्वाचा ठरणार आहे.

यशोधरा नगर पोलिसांच्या या कारवाईमुळे नागपुरातील घरफोडी आणि वाहन चोरीच्या आठ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. आता पुढील तपासात आणखी किती गुन्हे समोर येतात आणि या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याकडे पोलिसांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button