गुगलवर सिमेंट शोधलं अन् गमावले २.३० लाख! नागपुरात ऑनलाइन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

नागपूर | प्रतिनिधी
ऑनलाइन व्यवहारांमधील फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना नागपुरात सिमेंट खरेदीच्या नावाखाली तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुगलवर सिमेंट पुरवठादाराचा शोध घेतल्यानंतर एका भामट्याने स्वतःला कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवत ऑर्डर घेतली आणि पैसे मिळताच संपर्क तोडल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे अजींक्य अजय जोशी यांच्या कुटुंबीयांनी बांधकामासाठी सिमेंट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अजय जोशी यांनी गुगलवर सिमेंट पुरवठादाराचा शोध घेतला. यावेळी विपीन गुप्ता नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून स्वतःला सिमेंट कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगितले.
सिमेंटच्या दराबाबत चर्चा झाल्यानंतर जोशी यांनी एक हजार सिमेंट बॅगची ऑर्डर दिली. त्यानंतर आरोपीने एम. पी. बिरला परफेक्ट कंपनीचे डायरेक्टर शिवम कुमार यांच्या नावाने असलेल्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार जोशी यांनी २ लाख ३० हजार रुपये संबंधित खात्यात वर्ग केले.
मात्र पैसे जमा झाल्यानंतर आरोपीने संपर्क तोडला. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच सिमेंटचा मालही पाठविण्यात आला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजींक्य जोशी यांनी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गुगलवरील जाहिराती किंवा ऑनलाइन विक्रेत्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची अधिकृत माहिती, कंपनीचे कागदपत्रे आणि व्यवहाराची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणतीही मोठी रक्कम भरण्यापूर्वी संबंधित विक्रेता आणि कंपनीची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



