पुलावरील सुरक्षा भिंत तोडत ट्रक नदीत कोसळला; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

परतवाडा : परतवाडा-चांदूर बाजार मार्गावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील सुरक्षा भिंत तोडत थेट नदीपात्रात कोसळला. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा-चांदूर बाजार मार्गावरील पुलावरून जात असताना ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर गेला. चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता न आल्याने ट्रकने पुलाची सुरक्षा भिंत तोडली आणि थेट खाली नदीपात्रात कोसळला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.
या ट्रकमध्ये एकूण तीन जण प्रवास करत होते. अपघातात परतवाड्यातील बेगमपुरा परिसरातील समीर बेग यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेख समीर आणि मोहम्मद आसिफ हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जखमींना तातडीने बाहेर काढून अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नदीपात्रात कोसळलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ट्रक बाहेर काढण्यात यश आले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचे नियंत्रण सुटले होते की वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाबींचा शोध घेतला जात आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांच्या तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असून पुढील चौकशी सुरू आहे.



