AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; विप्लव आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. शिंदे सेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार विप्लव बाजोरिया आणि त्यांचे वडील, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात नवे वळण आले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अमरावती विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज आक्षेपांनंतर बाद करण्यात आला होता. या निर्णयानंतर विप्लव बाजोरिया आणि त्यांचे समर्थक रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या निर्णयाची प्रत मागण्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयात वाद निर्माण झाला. या वेळी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा तसेच आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. काही काळ कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनल्याची माहितीही समोर आली आहे.

घटनेनंतर निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्रीनंतर कारवाई करत अपराध क्रमांक ६३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम २२१, २९६ आणि ३(५) अन्वये विप्लव बाजोरिया, गोपीकिशन बाजोरिया आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाने दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप केला होता. मात्र आता त्यांच्याविरोधातच गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

अमरावती विधानपरिषद निवडणूक आधीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत असताना या नव्या घडामोडीमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात या प्रकरणावर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया आणि कायदेशीर घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्ज बाद झाल्यानंतर सुरू झालेला वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असून बाजोरिया पिता-पुत्रांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे अमरावतीच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button