बाजोरिया प्रकरण न्यायालयात; उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर नागपूर खंडपीठात धाव, आजच सुनावणीची शक्यता

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती विधानपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय आणि कायदेशीर ट्विस्ट समोर आला आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केल्यानंतर आता हे प्रकरण थेट नागपूर खंडपीठात पोहोचले आहे. निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर बाजोरिया यांनी न्यायालयाची दारं ठोठावली असून आजच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमरावती विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेल्या विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला होता. या निर्णयानंतर बाजोरिया यांचे वकील आणि सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. अखेर त्यांना निर्णयाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा करत न्यायालयाकडे दाद मागितली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेच्या माहितीसंदर्भात निवडणूक आयोगाने निर्धारित केलेला नवीन नमुना 26 विहित स्वरूपात सादर न केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. आवश्यक माहिती आयोगाने निर्धारित केलेल्या स्वरूपात न देता वेगळ्या पद्धतीने सादर केल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आला होता.
दरम्यान, बाजोरिया यांच्या वकिलांनी निवडणूक रिंगणातील सर्व चारही उमेदवारांचे अर्ज तपासणीसाठी मागवले आहेत. त्यामुळे आता इतर उमेदवारांच्या अर्जांचीही नव्याने छाननी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींमुळे अमरावती विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून न्यायालयाचा निर्णय निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो.
विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी कायम राहणार की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय न्यायालयाकडून कायम ठेवला जाणार, याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागपूर खंडपीठातील सुनावणीनंतर या राजकीय नाट्याला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.



