नांदेडमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; घोषणाबाजीने राजकीय वातावरण तापले

काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाचे आंदोलन; पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात
नांदेड | प्रतिनिधी
नांदेड शहरात बुधवारी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी येत आपल्या भूमिकेचे समर्थन करत घोषणाबाजी केली. त्यामुळे नांदेडमधील नवीन मोंढा परिसर काही काळ राजकीय घोषणांनी दणाणून गेला.
परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भूमिका मांडत आंदोलन केले.
या आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र, पोलिसांनी योग्य नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेमुळे नांदेडमधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, दोन्ही पक्षांच्या आंदोलनाची शहरभर चर्चा सुरू आहे.



