citynewsCrime NewsJalgaonLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या; रावेर पोलिसांनी काही तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न फसला; आरोपीला अटक, गुन्ह्याची कबुली

रावेर (जळगाव) | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह २१ जुलै रोजी रात्री संशयास्पद अवस्थेत नाल्याजवळ आढळून आला. माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत मृताच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्याने घातपाताचा संशय बळावला.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान मृताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे समोर आले.

तपासानुसार, २१ जुलै रोजी सायंकाळी आरोपीने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्याच्या कडेला ओढत नेऊन टाकला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

रावेर पोलिसांनी तांत्रिक आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे काही तासांतच आरोपी अनिल जखा बारेला याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

जमिनीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून, गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा केल्याबद्दल रावेर पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button