कामरगावात वीजप्रश्नावर शेतकऱ्यांचा संताप; रस्ता रोकोचा इशारा

टाईम टेबल असूनही वेळेवर वीज नाही; पाणी असूनही पिके जळण्याची भीती, रात्री शेतात ताटकळण्याची वेळ
वाशिम | कामरगाव
कामरगाव परिसरात महावितरणच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. अधिकृत वीजपुरवठ्याचे टाईम टेबल जाहीर करण्यात आले असतानाही त्यानुसार वीज मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्याची सोय उपलब्ध असूनही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने उभी पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे. वीज मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना चक्क भर रात्री शेतात ताटकळत बसावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महावितरणकडून वीजपुरवठ्याचे अधिकृत टाईम टेबल जाहीर करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात त्यानुसार वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
त्यातच बी लाईन उपलब्ध नसल्याने मोटर पंप केवळ एक ते दोन तासच सुरू राहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विहीर आणि इतर जलस्रोतांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही पिकांना आवश्यक तेवढे पाणी देता येत नाही. परिणामी हातातोंडाशी आलेली सोयाबीनसह इतर उभी पिके वाळून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

वीज नेमकी कधी येईल याची खात्री नसल्याने अनेक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन वीजपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. दिवसा शेतीची कामे आणि रात्री वीजेची वाट पाहणे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, या समस्येची माहिती मिळाल्यानंतर विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी, आमदार सईताई डहाके आणि शिवसेना तालुकाध्यक्ष मंगेशभाऊ मुंदे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अधिकाऱ्यांकडून वीज सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र कामरगाव महावितरण कार्यालयाकडून मुंबईहून मेसेज आल्यानंतरच लाईन सुरू करू, अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला.
संतप्त शेतकरी रस्ता रोको आंदोलनाच्या तयारीत असताना कामरगाव चौकीचे PSI गणेश शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्षात सुरळीत आणि वेळापत्रकानुसार वीजपुरवठा मिळावा, अशी शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
कामरगावच्या शेतकऱ्यांसमोर आता एकच मोठा प्रश्न उभा आहे — पाणी उपलब्ध असूनही वीज नसल्यामुळे पिके जळून गेली, तर या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे महावितरण प्रशासन या गंभीर प्रश्नावर तातडीने कोणता निर्णय घेते आणि शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी सागर घोडे, सिटी न्यूज.



