अंजनसिंगीतील बेपत्ता १८ वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह

काही दिवसांपासून होता बेपत्ता; अपघात, आत्महत्या की घातपात? कुऱ्हा पोलिसांकडून तपास सुरू
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील अंजनसिंगी गावात काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आकाश गजानन सहारे असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास कुऱ्हा पोलीस करीत आहेत.
आकाश सहारे हा ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर आकाशच्या वडिलांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, तपासादरम्यान आकाशचा मृतदेह अंजनसिंगी येथील शेतशिवारातील एका विहिरीत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आकाशचा मृत्यू अपघाती झाला की त्याने आत्महत्या केली अथवा हा घातपाताचा प्रकार आहे, या सर्व शक्यतांचा तपास पोलीस करीत आहेत.
शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातून आकाशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूने सहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अंजनसिंगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



