citynewsCrime NewsNagpurNagpurCrime

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, दागिने पॉलिशच्या बहाण्याने फसवणुकीचे दोन गुन्हे उघड

नंदनवन परिसरातील कारवाई; शस्त्रे, मोबाईलसह ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त, काही आरोपी बिहारमध्ये फरार

नागपूर शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर पांधण रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान या टोळीने सोने-चांदीचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विद्यानगर पांधण रोड परिसरातील शेतालगतच्या मोकळ्या जागेत सापळा रचला. दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

आरोपींकडून चार अँड्रॉइड मोबाईल, धारदार चाकू, लोखंडी टॉमी, एल-हूक असलेली टॉमी, मिरची पावडर तसेच दोरी असा एकूण ६१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या तपासात हीच टोळी सोने-चांदीचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. आरोपी दागिने स्वच्छ करण्यासाठी केमिकलचा वापर करून त्यातील सोन्याचा अंश वेगळा काढत किंवा दागिने घेऊन पसार होत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

या कारवाईदरम्यान नंदनवन आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अशा स्वरूपाच्या दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, या टोळीतील काही आरोपी बिहारमध्ये पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

या टोळीचा आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. तसेच अशाच प्रकारे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक झालेल्या नागरिकांनी नंदनवन पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button