नागपूर गोळीबार प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; आरोपींना अटक

पिस्तूल, काडतुसे, चाकू, वाहन व मोबाईलसह ६.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा करत पाचपावली पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, चाकू, वाहन आणि मोबाईलसह एकूण ६ लाख ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिचरा मार्केट परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान फिर्यादी आणि आरोपी यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले असून आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर हल्ला केला. यावेळी आरोपीने पिस्तूलातून गोळी झाडली. सुदैवाने गोळी फिर्यादीला न लागता जमिनीवर लागल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले सिल्व्हर रंगाचे मॅगझीनयुक्त लोखंडी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, लोखंडी चाकू, घटनेत वापरलेले वाहन तसेच चार मोबाईल जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ६ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिसांच्या पथकाने केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वाढदिवसाच्या कार्यक्रमातील किरकोळ वादातून घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेचा अल्पावधीत उलगडा करून आरोपींना अटक करण्यात पाचपावली पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपासाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.



