नागपूर हादरलं! जरीपटका परिसरात भरदिवसा रक्तरंजित हल्ला; महिलेची प्रकृती गंभीर

नागपूरच्या उपराजधानीत भरदिवसा झालेल्या एका रक्तरंजित हल्ल्याने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. जरीपटका परिसरात दोन कुटुंबांतील जुन्या वादाने भीषण रूप धारण करत लोखंडी रॉड, हातोडे आणि लाठ्या-काठ्यांनी सरेआम जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत एका महिलेच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आला असून त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून साधवानी कुटुंबाने दामवानी कुटुंबावर अचानक हल्ला चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हल्ल्यादरम्यान गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. भरचौकात घडलेल्या या थरारक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे.
पीडित कुटुंबाने जरीपटका पोलिसांवर गंभीर आरोप करत मुख्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा दावा केला आहे. आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्यामुळे कुटुंब दहशतीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दोन्ही कुटुंबांविरोधात क्रॉस एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
नागपूरसारख्या मोठ्या शहरात भरदिवसा घडलेला हा रक्तरंजित प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे. आता पोलिसांची पुढील कारवाई काय होते आणि आरोपींना नेमकं कधी अटक होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



