citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpur

ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याने विश्वासू मॅनेजर बनला कोट्यवधींचा घोटाळेबाज; नागपुरात दोन कोटींचा अपहार उघड

नागपूरमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनाने एका विश्वासू मॅनेजरला थेट गुन्हेगार बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मालकाच्याच खात्यातून तब्बल दोन कोटी रुपये लाटत ते पैसे ऑनलाईन सट्ट्यात उडवल्याचा आरोप संबंधित मॅनेजरवर करण्यात आला आहे. फेक UPI आयडी, बनावट चेक आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे हा संपूर्ण काळा खेळ सुरू होता. मात्र एका चेक बाउन्समुळे संपूर्ण घोटाळ्याचं बिंग फुटलं असून आरोपी आता जरीपटका पोलिसांच्या ताब्यात आहे.

नागपूरच्या जरीपटका आणि इतवारी भागात ‘अशोक हार्डवेअर’ नावाने व्यवसाय करणारे व्यापारी शंकरलाल खटुमाल यांनी आपल्या दुकानाची जबाबदारी जैकुमार खुर्रे या तरुण मॅनेजरकडे सोपवली होती. मालकाचा पूर्ण विश्वास संपादन केलेल्या जैकुमारनेच आता कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप समोर आला आहे.

माहितीनुसार, ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनात अडकलेल्या आरोपीने दुकानाच्या बँक खात्याशी स्वतःचा बनावट UPI आयडी लिंक केला होता. त्यानंतर संशय येऊ नये म्हणून कधी एक लाख तर कधी दोन लाख रुपये अशा टप्प्याटप्प्याने रक्कम स्वतःच्या खात्यात वळवण्यात आली.

इतक्यावरच न थांबता आरोपीने मालकाच्या नावाचे बनावट चेक तयार केले. त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या करून बँकेतून पैसे काढल्याचाही आरोप आहे. दुकानातील व्यवहार प्रामुख्याने RTGS द्वारे होत असल्यामुळे सुरुवातीला मालकाला कोणताही संशय आला नाही.

मात्र अचानक एक चेक बाउन्स झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर तब्बल दोन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आणि मालकाला मोठा धक्का बसला.

मालकाच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी जैकुमार खुर्रे विरोधात विश्वासघात, फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सध्या सुरू असून पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे.

क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे विश्वास, व्यवसाय आणि नातेसंबंध कसे उद्ध्वस्त होऊ शकतात, याचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. आता या प्रकरणातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button