धंतोली पोलिसांची मोठी कामगिरी; 72 तासांत साडेचार लाखांच्या चोरीचा उलगडा

87 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अटकेत; रोख रक्कम, एलईडी टीव्ही, मोबाईल आणि दुचाकी जप्त
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरातील फेअरडील दुकानात झालेल्या साडेचार लाख रुपयांहून अधिकच्या चोरीचा धंतोली पोलिसांनी अवघ्या 72 तासांत उलगडा केला आहे. तांत्रिक तपास आणि 87 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी व्यापारी नरेंद्र वेरहोमल शिवनानी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चोरट्यांनी दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 3 लाख 44 हजार रुपयांची रोख रक्कम, विविध कंपन्यांचे एलईडी टीव्ही आणि एक मोबाईल असा एकूण 4 लाख 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन धंतोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी परिसरातील तब्बल 87 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी विश्वजीत नेतराज भोसले (वय 21 वर्ष, रा. तामनापूर, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) याला अटक केली. चौकशीनंतर आरोपीकडून चोरीतील रोख रक्कम, एलईडी टीव्ही, मोबाईल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात इतर आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास धंतोली पोलीस करत आहेत.
धंतोली पोलिसांनी अल्पावधीत केलेल्या तांत्रिक आणि प्रभावी तपासामुळे मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळाले असून, या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



