राजापेठ पोलिसांची मोठी कामगिरी; घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश, दोन सराईत आरोपी जेरबंद

तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस; चोरीतील रोख रक्कम जप्त, आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या मालिकेचा यशस्वी पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून चोरीतील २० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.
राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तेजस गणवीर पंडीत (वय २२, रा. फ्रेजरपुरा, अमरावती) आणि संकेत रामदास धोटे (वय १९, रा. नेरपरसोपंत, जि. यवतमाळ) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोन्ही आरोपींनी संबंधित घरफोडीची कबुली दिली. पुढील तपासात आरोपी तेजस पंडीत याने राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी एकूण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून चोरीतील २० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून आणखी काही घरफोडी किंवा तत्सम गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
राजापेठ पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, शहरातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्याच्या दिशेने पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



