नागपुरातील हसनबाग परिसरात डीपीला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

नागपुरातील हसनबाग कब्रस्तान परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपूल बांधकामादरम्यान अचानक एका डीपीला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
नागपुरातील हसनबाग कब्रस्तान परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपूल बांधकामादरम्यान अचानक एका वीज वितरण डीपीमध्ये आग लागली. आग लागताच परिसरात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले आणि कामगारांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डीपीमधून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आणि कामगारांनी तात्काळ फायर एक्सटिंग्विशरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.
त्यांच्या तत्परतेमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी बांधकाम साईटवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



