नागपुरात मैत्रीचे नाते रक्तरंजित! किरकोळ वादातून मित्राची दगडाने ठेचून हत्या

मानसिक आजाराने ग्रस्त दोघांमध्ये मध्यरात्री वाद; पोलिसांची दीड तासात आरोपीला अटक
नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दोन मित्रांमधील किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात दगडाने वार करत त्याची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे मृत आणि आरोपी दोघेही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तत्पर कारवाई करत अवघ्या दीड तासात आरोपीला अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव दीपक चंद्रलेक असे असून आरोपीचे नाव अमोल लक्ष्मण वाघमारे आहे. दोघेही अनेक दिवसांपासून एकत्र फिरत होते आणि त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
माहितीनुसार, काल रात्री दोघांनी आरोपी अमोलच्या घरी एकत्र जेवण केले. जेवणानंतर ते घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले. मात्र रात्री उशिरा दोघांमध्ये अचानक किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात अमोल वाघमारे याने दीपकच्या डोक्यावर दगडाने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की दीपकचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे डीबी पथक आणि ग्रेट मार्शल्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसतानाही पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर अवघ्या एक ते दीड तासाच्या आत आरोपी अमोल लक्ष्मण वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या घटनेमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



