citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

डिझेल टंचाईच्या चर्चांदरम्यान जिल्हाधिकारी विकास मीना मैदानात; यवतमाळातील पेट्रोल पंपांची अचानक पाहणी

यवतमाळ जिल्ह्यात डिझेल टंचाईच्या चर्चांनी जोर धरला असताना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वतः मैदानात उतरून शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांची अचानक पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना डिझेलसाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

यवतमाळ जिल्ह्यात सध्या डिझेल टंचाईच्या चर्चांमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली असताना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर अचानक भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

दारव्हा नाका परिसरातील जैस्वाल पेट्रोल पंप तसेच पांढरकवडा रोडवरील धनगंगा पेट्रोल पंप येथे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पेट्रोल पंपावरील इंधन साठा, वितरण व्यवस्था, नोंदवही, पुरवठ्याशी संबंधित कागदपत्रे आणि सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली.

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासणार असल्याने त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना दिले.

इंधन वितरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवावी, अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे आणि इंधन साठ्याची अद्ययावत माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे लावावी, अशाही सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या.

सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश देत कृत्रिम टंचाई किंवा कोणताही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक पाहणीमुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्याबाबत गंभीर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम तसेच संबंधित पेट्रोल पंप चालक उपस्थित होते.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना डिझेलचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. आता पुढील काही दिवसांत परिस्थिती कितपत नियंत्रणात राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button