अमरावतीत लाल डब्बा शाळेवर मध्यरात्री धडक कारवाई; नेहरू मैदान परिसर घुमंतूमुक्त

अमरावती शहरातील नेहरू मैदान परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या ऐतिहासिक लाल डब्बा शाळेवर आणि मैदानावर अखेर मनपाच्या अतिक्रमण विभागाने आणि सिटी कोतवाली पोलिसांनी संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली आहे. रात्री बारा वाजता सुरू झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेकडो घुमंतूंचा तात्काळ पलायन झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमरावती शहरातील नेहरू मैदान परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या लाल डब्बा शाळेच्या इमारतीवर घुमंतूंचा मोठ्या प्रमाणात कब्जा झाला होता. या प्रकारामुळे परिसरात अस्वच्छता, अतिक्रमण आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
सिटी न्यूजने या प्रकरणावर सखोल रिपोर्ट प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आणि अखेर 26 मेच्या रात्री मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली.
रात्री बारा वाजता मनपा अतिक्रमण विभाग आणि सिटी कोतवाली पोलिसांनी मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांमधून तसेच शाळेच्या मागील बाजूने एकाचवेळी एंट्री घेत कारवाई सुरू केली.
पोलिसांची हालचाल आणि मोठा बंदोबस्त पाहून अंदाजे 200 ते 250 घुमंतूंनी तात्काळ तेथून पलायन केले आणि आसपासच्या परिसरात विखुरले गेले.
कारवाईदरम्यान लाल डब्बा शाळेच्या इमारतीतून सुमारे चार ट्रक अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले. तर गुलशन मार्केटच्या मागील बाजूस लपून बसलेल्या काही घुमंतूंवरही कारवाई करत त्यांच्या ताब्यातील तीन कटला रिक्षा जप्त करण्यात आली.
पलायन केलेल्या घुमंतूंना नंतर पोलिसांनी वाहनांमध्ये बसवून राजुरा बेडा परिसरात सोडले.
या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणताही विरोध झाला नाही. पोलिसांचा मोठा फौजफाटा, महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि चार व्हॅनची उपस्थिती यामुळे कारवाई अधिक प्रभावी ठरली.
सुमारे दीड तास चाललेल्या या धडक कारवाईने नेहरू मैदान परिसर पूर्णपणे घुमंतूमुक्त करण्यात आला आहे.
मात्र आता खरी जबाबदारी मनपा प्रशासनावर आहे. परिसराची तात्काळ स्वच्छता आणि देखभाल न झाल्यास पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कारवाईत अतिक्रमण विभागाचे अधिकारी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली चार ट्रक टीम आणि सिटी कोतवाली पोलिसांसह 20 हून अधिक कर्मचारी सहभागी होते.
नेहरू मैदान परिसरातील ही कारवाई तात्पुरता दिलासा देणारी ठरली असली तरी आता पुढील टप्प्यात प्रशासन किती तत्परतेने स्वच्छता आणि पुनर्विकासाचे काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्यथा ही समस्या पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.



