लखनऊ–आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; डुलकीमुळे बस उलटली, ६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात लखनऊ–आग्रा एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे भीषण बस अपघात घडला. वेगाने धावणाऱ्या डबल डेकर बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कठड्यावर आदळून उलटली. या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही डबल डेकर बस दिल्लीहून गोरखपूरकडे जात होती. उन्नाव जिल्ह्यातील औरास पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने बस थेट रस्त्याच्या कठड्यावर जाऊन धडकली आणि उलटली. धडकेनंतर बसच्या काचा फुटल्या आणि काही प्रवासी खिडक्यांतून बाहेर फेकले गेले.
या भीषण अपघातात बिहार पोलिस दलातील पोलीस अधिकारी रामचंद्र राम आणि कैदी छत्रपाल सिंह यांचाही मृत्यू झाला आहे. संबंधित कैद्याला गुरुग्राम न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले होते. सुनावणी पूर्ण करून परतताना हा दुर्दैवी अपघात घडला.
अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते. अनेकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. एका प्रवाशाचा पाय तुटल्याचेही समोर आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि बचाव कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य राबवत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.



