अशोक खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा; अघोरी पूजा आणि फसवणुकीचे गंभीर आरोप

भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अघोरी पूजा, दैवी तोडगे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप या भोंदूबाबावर करण्यात आला आहे. कमलेश अधिकारी असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील दोन भावांना मृत्यूयोगाची भीती दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितांना विविध अघोरी विधी आणि दैवी संकटांचे भय दाखवून आर्थिक शोषण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि दैवी उपचारांच्या नावाखाली गंभीर प्रकार घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितांच्या मानसिक भीतीचा फायदा घेत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय मठ उभारण्याच्या बहाण्याने पीडितांची तब्बल दोन एकर जमीन परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतल्याचाही गंभीर आरोप कमलेश अधिकारीवर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलिसांकडून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



