AmravaticitynewsLatest NewsLocal NewsMaharashtra

अमरावतीत ‘आपली बस’ सेवेला तात्पुरते जीवदान; 25 जूनपर्यंत सेवा सुरू राहणार

अमरावती शहर बससेवेचा मोठा पेच अखेर काहीसा सुटला आहे. उद्यापासून बंद होण्याची शक्यता असलेल्या ‘आपली बस’ सेवेला आता महिनाभराचे तात्पुरते जीवदान मिळाले आहे. कंत्राटदार आणि महापालिका प्रशासन यांच्यात झालेल्या निर्णायक बैठकीत अटींवर आधारित सेवा सुरू ठेवण्यावर सहमती झाली आहे.

अमरावती महापालिकेच्या ‘आपली बस’ सेवेला अखेर महिनाभरासाठी दिलासा मिळाला आहे. कंत्राटाची मुदत संपल्याने ही बससेवा उद्यापासून बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र महापौर, महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत कंत्राटदारासोबत झालेल्या बैठकीनंतर तात्पुरता तोडगा निघाला आहे.

सध्या शहरात 12 बसेस सहा मार्गांवर धावत असून दररोज सुमारे 12 हजार प्रवासी या सेवेवर अवलंबून आहेत. विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे बससेवा बंद होण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, कंत्राटदार कंपनीने दरमहा सहा ते सात लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे सांगत सेवा सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शवली होती. वाढते इंधन दर, देखभाल खर्च आणि विमा खर्चामुळे आर्थिक ताण वाढल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला.

बैठकीदरम्यान कंत्राटदाराने विमा खर्च आणि आर्थिक भरपाई यासंदर्भात काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. दुसरीकडे, सध्या लागू असलेल्या आचारसंहितेमुळे तातडीने आर्थिक निर्णय घेणे शक्य नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली.

अखेर दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चर्चेनंतर 25 जूनपर्यंत शहर बससेवा अटींवर सुरू ठेवण्यास कंत्राटदाराने सहमती दर्शवली. त्यामुळे सध्या तरी बससेवा बंद होण्याचे संकट टळले आहे.

मात्र हा केवळ तात्पुरता तोडगा असल्याने पुढील काळात ‘आपली बस’ सेवेला कायमस्वरूपी दिलासा मिळणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आर्थिक अडचणी आणि प्रशासनाच्या निर्णयांवर या सेवेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

अमरावतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी ‘आपली बस’ भविष्यात कायम सुरू राहणार की पुन्हा बंद होण्याच्या उंबरठ्यावर येणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button