बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धावडा येथे शांतता समिती बैठक; सामाजिक सलोखा जपण्याचे पोलिसांचे आवाहन

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत सण उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले. पाहूया हा विशेष रिपोर्ट.
आगामी ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धावडा ग्रामपंचायत येथे पारध पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने आणि बिट जमादार सुभाष जायभाय यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. धावडा गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्य हीच गावाची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही समाजातील नागरिक अनेक वर्षांपासून एकमेकांचे सण परस्पर सन्मान आणि उत्साहाने साजरे करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच शासनाच्या निर्देशांनुसार आणि लागू असलेल्या नियमांचे पालन करूनच बकरी ईद साजरी करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीला एकबाल सेठ पठाण, मुख्तार सेठ पठाण, दिनेश देवकर, सिलेमान सेठ, पत्रकार राजू शहा, करीम मिया, कलाम सेठ, ईश्वर सपकाळ, अहमद सेठ, एकबाल सैय्यद, मोतीलाल वैरी, शेख जावेद, राम पवार, सैय्यद जमान, शेख जाकीर, शेख सादिक यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत शांतता, बंधुभाव आणि कायद्याचे पालन करण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला.
धावडा गावातील शांतता समिती बैठकीतून पुन्हा एकदा सामाजिक सलोखा आणि परस्पर विश्वासाचा संदेश देण्यात आला आहे. बकरी ईद सण शांततेत आणि शासकीय नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.



