citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

रामटेकमध्ये गंगा दशहरा निमित्त अंबाळा कुंड तलाव हजारो दीपांनी उजळला; भव्य माँ गंगा दीप महोत्सवात भक्तीचा महासागर

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील अंबाळा कुंड तलाव आज हजारो दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला. गंगा दशहरा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य माँ गंगा दीप महोत्सव 2026 मध्ये हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवला. वैदिक मंत्रोच्चार, अखंड ज्योत, आकर्षक रथयात्रा, भव्य आतिषबाजी आणि दीपदानामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. भारतीय जनसेवा मंडळाच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्याने रामटेक परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवले. पाहूया आमचे प्रतिनिधी अजय मेहरकुळे यांचा हा विशेष रिपोर्ट.

गंगा दशहरा पर्वानिमित्त रामटेक तालुक्यातील अंबाळा कुंड तलाव परिसरात भारतीय जनसेवा मंडळातर्फे भव्य माँ गंगा दीप महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याची सुरुवात रामटेक गड मंदिर परिसरातील अगस्त मुनी आश्रमातून अखंड ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. ही पवित्र ज्योत रामटेक शहरातून भव्य मिरवणुकीद्वारे अंबाळा तलावात आणण्यात आली. मार्गभर भक्तांनी जयघोष करत या धार्मिक सोहळ्याचे स्वागत केले.

अंबाळा तलाव घाटावर पोहोचल्यानंतर वैदिक पद्धतीने मंत्रोच्चारात माँ गंगेची विधिवत पूजा करण्यात आली. नामवंत साधू-संतांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पूजाविधीमुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरली ती भव्य रथयात्रा आणि नेत्रदीपक आतिषबाजी. रंगीबेरंगी रोषणाई आणि आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांच्या प्रकाशाने अंबाळा तलाव परिसर उजळून निघाला. हजारो भाविकांनी या अद्भुत सोहळ्याचा आनंद घेतला.

विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी आपल्या घरातून दीप आणून तलाव परिसरात प्रज्वलित केले. हजारो दीपांच्या प्रकाशामुळे घाट परिसर जणू दिव्यांच्या महासागरात परिवर्तित झाला होता. श्रद्धा आणि भक्तीचा हा अनोखा नजारा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

कार्यक्रमाला माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, रामटेक नगर परिषद अध्यक्ष बिक्रेद महाजन, राहुल कोठेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपकलशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा दीप महोत्सव भाविकांच्या स्मरणात कायम राहणार आहे.

गंगा दशहरा निमित्त अंबाळा कुंड तलावात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दीप महोत्सवाने श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम घडवून आणला. हजारो दीपांच्या प्रकाशात उजळलेला घाट, वैदिक मंत्रोच्चार, रथयात्रा आणि महाप्रसादामुळे हा सोहळा रामटेकच्या धार्मिक इतिहासातील संस्मरणीय क्षण ठरला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button