वर्ध्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न; जळालेल्या मशीनमुळे खळबळ, पोलिसांचा तपास वेगात

मोरांगणा (खरांगणा) येथील घटना; श्वानपथक, फॉरेन्सिक आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील मोरांगणा (खरांगणा) येथे अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, एटीएम मशीन जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मशीनमधून धूर आणि आग दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्राथमिक स्तरावर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग पूर्णपणे विझवली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले तसेच खरांगणा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, तेथील पुरावे संकलित करण्याचे काम करण्यात आले. एटीएम फोडण्यामागील नेमका उद्देश, त्यामध्ये किती नुकसान झाले आणि रोख रक्कम चोरीला गेली का, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
मोरांगणा येथील या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.



