citynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

धामणगाव रेल्वेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

पिवळ्या ध्वजांनी सजले शहर, हजारो समाजबांधवांचा सहभाग; सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी जयंती उत्साहात

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसह काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारो समाजबांधव सहभागी झाले. पिवळ्या ध्वजांनी सजलेल्या शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष घुमत सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडले.

जयंतीनिमित्त सकाळपासून शहरातील विविध भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शहरभर पिवळ्या ध्वजांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी दत्तापूर येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मातंग समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. डीजे, बँजो, पारंपरिक वाद्ये आणि विविध आकर्षक देखाव्यांसह निघालेल्या मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवर उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

मिरवणुकीदरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष, पिवळ्या ध्वजांची दिमाखदार शोभा आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण धामणगाव रेल्वे शहर दुमदुमून गेले. युवक, युवती, महिला आणि पुरुषांनी नाचत-गात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जयंती सोहळा संस्मरणीय केला.

ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचली. तेथे महाआरती, अभिवादन आणि सामूहिक कार्यक्रमानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शांतता, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या जयंती सोहळ्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समता, श्रमिकांचा सन्मान आणि परिवर्तनाच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button