अकोल्यात ट्रॅक्टर शोरूमच्या बेसमेंटला भीषण आग; स्फोटांमध्ये दोन अग्निशमन कर्मचारी भाजले

अकोल्यातील शिवानी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर शोरूम आणि सर्व्हिस सेंटरच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तेलाच्या बॅरलचे एकामागून एक स्फोट होत असताना आग विझवण्यासाठी गेलेले दोन अग्निशमन कर्मचारीही भाजल्याची माहिती समोर आली आहे.
अकोल्यातील शिवानी परिसरात असलेल्या एका ट्रॅक्टर शोरूम आणि सर्व्हिस सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. बेसमेंटमध्ये ठेवलेल्या तेलाच्या बॅरलना आग लागल्यानंतर जोरदार स्फोट होऊ लागले. स्फोटांच्या आवाजामुळे संपूर्ण परिसरात अफरातफर माजली असून नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. मात्र बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचे ड्रम असल्याने आग वारंवार भडकत होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, आग विझवण्याचे काम सुरू असताना झालेल्या एका मोठ्या स्फोटात दोन अग्निशमन कर्मचारी भाजले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या प्रभारी आयपीएस अधिकारी इशानी आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या घटनास्थळी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे.
जिल्ह्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे अग्निशमन दलाला वेळेवर पुरेसे पाणी मिळण्यात अडचणी आल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे घटनास्थळाच्या अगदी जवळ इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा पेट्रोल पंप होता. मात्र वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्यामुळे आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली नाही आणि मोठा अनर्थ टळला. सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोल पंप तातडीने बंद करण्यात आला होता आणि कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले होते.
जर ही आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेने सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सध्या पोलिसांकडून आगीच्या कारणांचा तपास सुरू असून नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.



