citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात ५५०० रुपयांच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या; आरोपीची स्वतः पोलिसांना कबुली

नागपुरातील हिवरीनगर झोपडपट्टी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ५५०० रुपयांच्या वादातून सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून “मी माझ्या भावाला मारले” अशी कबुली दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

२४ मे २०२६ रोजी पोलिस स्टेशनच्या बीट मार्शल यांना १०० आणि ११२ नियंत्रण कक्षाकडून एक धक्कादायक संदेश प्राप्त झाला. “मी माझ्या भावास मारून त्याचा खून केलेला आहे” असा आशय त्या संदेशामध्ये नमूद होता. संदेश मिळताच पोलिसांनी तात्काळ हिवरीनगर झोपडपट्टी परिसरात धाव घेतली.

घटनास्थळी भगवान गोविंदराव बाबुळे वय ४२ वर्षे हा व्यक्ती उपस्थित होता. त्याने घटनास्थळी पडून असलेल्या व्यक्तीची ओळख प्रदीप गोविंदराव बाबुळे वय ३९ वर्षे अशी करून दिली. मृतक हा त्याचा सख्खा भाऊ असल्याचेही त्याने सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, मृतक प्रदीप बाबुळे याच्याकडे मजुरीचे सुमारे ५५०० रुपये होते. याच पैशांच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपी भगवान बाबुळे याचे स्वतःवरील नियंत्रण सुटले.

त्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोखंडी टॉमीने त्याने आपल्या भावावर हल्ला केला. या मारहाणीत प्रदीप बाबुळे यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसराची पाहणी केली आणि घटनास्थळ तात्काळ सुरक्षित करण्यात आले. सध्या परिसरात शांतता असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक चौकशीदरम्यान आरोपी आणि मृतक या दोघांचीही कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही फर्निचर कामगार म्हणून काम करत होते. मृतकाला स्वतंत्र कुटुंब नसल्याची माहिती असून आरोपी भगवान बाबुळे याला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिस अभिलेख तपासात देखील दोघांविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा किंवा तक्रार नोंद नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात ही घटना तात्कालिक कारण आणि आपापसातील वादातून घडल्याचे समोर आले असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

क्षणिक राग आणि पैशांच्या वादातून एका कुटुंबाची वाताहत झाली आहे. छोटा वाद किती मोठ्या दुर्घटनेत बदलू शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button