citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

विदर्भात उष्णतेचा कहर; यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासांत उष्माघाताच्या संशयातून ८ जणांचा मृत्यू

विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू असून गेल्या ४८ तासांत उष्माघाताच्या संशयातून तब्बल ८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन सतर्क झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच गेल्या ४८ तासांत उष्माघाताच्या संशयातून ८ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

दिग्रस येथे अवघ्या २४ तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पुसदमध्ये दोन मृत्यूंची नोंद झाली असून बाभुळगाव तालुक्यातील गवंडी येथे एक मृतदेह आढळून आला आहे.

मृतांमध्ये काही जणांची ओळख पटली असून काही मृतदेह अद्याप अज्ञात असल्याची माहिती समोर येत आहे.

बाभुळगाव तालुक्यातील गवंडी ते किन्ही मार्गावर मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला. तर पुसदच्या हनुमान वॉर्डातील वृद्ध महिला अन्नपूर्णाबाई या उन्हात कूलरमध्ये पाणी भरत असताना अचानक अस्वस्थ झाल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

तसेच पुसदच्या इंदिरानगर परिसरातील सुभाष राठोड यांच्या मृत्यूनेही परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे. बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा सुती कपडा ठेवावा तसेच भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या सर्व मृत्यूंचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी प्राथमिक अंदाज उष्माघाताचा व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यवतमाळमध्ये वाढत्या तापमानाने धोक्याची घंटा वाजवली आहे. नागरिकांनी काळजी घेणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button