citynewsLatest NewsMaharashtraNanded

नायगावमध्ये गॅस तुटवड्यावर नागरिकांचा संताप; रिकामे सिलेंडर रस्त्यावर फेकत महामार्गावर चक्काजाम

नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज थेट रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. डॉ. हेडगेवार चौकात शेकडो नागरिकांनी रिकामे गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवत आणि काही सिलेंडर रस्त्यावर फेकत प्रशासन व गॅस वितरण व्यवस्थेविरोधात तीव्र निषेध नोंदवला.

या आंदोलनामुळे नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

१० ते १५ दिवस सिलेंडरचा प्रतीक्षा कालावधी

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून नायगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण अत्यंत विलंबाने होत आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर आणि ओटीपी मिळूनही १० ते १५ दिवस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला.

गॅस उपलब्ध नसल्यामुळे स्वयंपाकासह दैनंदिन घरगुती कामांवर परिणाम होत असून विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

प्रशासनाविरोधात तीव्र रोष

रिकामे सिलेंडर रस्त्यावर ठेवत नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित गॅस एजन्सीविरोधात घोषणाबाजी केली. गॅस वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत करण्यात यावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

या आंदोलनानंतर आता प्रशासन आणि गॅस वितरण एजन्सी या समस्येवर कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button