अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; चांदूर रेल्वेत १.०१ कोटींचा अवैध गुटखा जप्त

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत गुटखा माफियांना जबर धक्का दिला आहे. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १ कोटी १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात १० टन गुटखा, मालवाहू ट्रक आणि दोन मोबाईल फोनचा समावेश आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा
चांदूर रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत MH 01 CV 4962 क्रमांकाचा मालवाहू ट्रक अडवला.
ट्रकमध्ये १० टन गुटखा
ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी एकूण १० टन गुटखा जप्त केला.
१ कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालाची अंदाजे किंमत पुढीलप्रमाणे आहे:
- अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू – ₹75,75,000
- मालवाहू ट्रक – ₹25,00,000
- दोन मोबाईल फोन – ₹60,000 (अंदाजे)
एकूण मुद्देमाल – ₹1,01,35,000
चालक ताब्यात, तीन आरोपी फरार
या प्रकरणात ट्रक चालक शेख इम्रान शेख मुस्कान (वय ३६ वर्षे), रा. पठाण चौक, अमरावती याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या रॅकेटमधील आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.
गुटखा माफियांमध्ये खळबळ
अवैध गुटखा तस्करीविरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि फरार आरोपी कधी अटकेत येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



