AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

मनपा शाळा कुठेच कमी नाहीत! उर्दू हायस्कूलचा 88% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अमरावती : “मनपा शाळा म्हणजे कमी दर्जा” असा समज अजूनही काही जणांच्या मनात आहे. मात्र अमरावतीतील महानगरपालिका उर्दू हायस्कूल, जमिल कॉलनी (इंग्लिश मीडियम) ने बारावीच्या निकालात उल्लेखनीय यश मिळवत हा समज अक्षरशः खोटा ठरवला आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल 88 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मनपा शाळांची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

बारावीच्या निकालानंतर शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

आयेशा प्रथम, तहेमा द्वितीय, जवेरीया तृतीय

या निकालात आयेशा समन अब्दुल समद हिने 73 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.
त्यानंतर तहेमा अजीन अतहर अहमद हिने 69.33 टक्के गुणांसह द्वितीय, तर जवेरीया तसलीम अब्दुल नईम हिने 63.50 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

‘मनपा शाळा कुठेच कमी नाहीत’

यावेळी बोलताना शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“मनपा शाळा कुठेच कमी नाहीत, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि जिद्द असेल तर मनपा शाळेतील विद्यार्थीही मोठं यश मिळवू शकतात,” असे त्या म्हणाल्या.

शिक्षक-पालकांचाही मोठा वाटा

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यांचा मोठा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मनपा शाळांसाठी प्रेरणादायी उदाहरण

महानगरपालिका उर्दू हायस्कूलचा हा निकाल मनपा शाळांच्या गुणवत्तेचा एक उत्तम नमुना ठरत आहे.
मर्यादित साधनसामग्री, आव्हानात्मक परिस्थिती आणि अनेक अडचणी असूनही विद्यार्थ्यांनी दाखवलेली ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.

परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्की मिळतं… मनपा उर्दू हायस्कूलच्या निकालाने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button