किरकोळ वादातून हार्वेस्टर चालकाचा निर्घृण खून; साखरखेर्डा पोलिसांची काही तासांत कारवाई, आरोपी जेरबंद

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात पुन्हा एकदा खुनाच्या थरारक घटनेने खळबळ उडाली आहे. पिंपळगाव उंडा येथे एका हार्वेस्टर चालकाची लोखंडी रॉडने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या प्रकरणात साखरखेर्डा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करत तपासातील तत्परता दाखवली आहे.
मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा गावाजवळील एका शेतात ही घटना उघडकीस आली. पंजाब राज्यातील शकीरपूर खान येथील ५५ वर्षीय करमजीतसिंग जनमजीतसिंग हे हार्वेस्टर चालक म्हणून आपल्या मजुरांसह साखरखेर्डा परिसरात आले होते. ते पिंपळगाव उंडा येथील एका धाब्याजवळ मुक्कामाला होते.
माहितीनुसार, रात्री करमजीतसिंग आणि बबलूसिंग यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात झालेल्या शिवीगाळीमुळे बबलूसिंग संतापला. याच रागातून रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने लोखंडी रॉडने करमजीतसिंग यांच्या डोक्यावर जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात करमजीतसिंग यांचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपीने घटना लपवण्याचा प्रयत्न केला. करमजीतसिंग यांचा मृतदेह खाटेवर झोपलेल्या अवस्थेत ठेवण्यात आला, तर इतर मजूर काही अंतरावर झोपलेले होते.
सकाळी शिवाजी काळे हे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना संशय आला. जवळ जाऊन पाहिले असता करमजीतसिंग मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
ठाणेदार गजानन करेवाड यांनी पंचनामा करत तपास सुरू केला. अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला.
पोलिसांनी संशयावरून सात जणांना ताब्यात घेत चौकशी केली. तपासादरम्यान अमित कुमार याने महत्त्वाची माहिती दिल्यानंतर आरोपी बबलूकरणसिंग याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
किरकोळ वादातून झालेल्या या खुनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र दुसरीकडे, अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद करत साखरखेर्डा पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.



