सावनेरमध्ये टोमॅटोने भरलेली आयसर डिव्हायडरवर आदळली; दोघे गंभीर जखमी, स्थानिकांच्या तत्परतेने बचाव

नागपूर जिल्ह्यातील सावनेर परिसरात आज एक भीषण अपघात घडला. टोमॅटोने भरलेली आयसर गाडी थेट डिव्हायडरवर आदळल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की जखमी गाडीतच अडकून पडले होते. मात्र, स्थानिकांच्या तत्परतेमुळे दोघांचे प्राण वाचले.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथून टोमॅटो घेऊन तेलंगणा राज्यातील महिबुबाबादकडे निघालेली आयसर गाडी क्रमांक TS 26 T 9993 सावनेर परिसरात अपघातग्रस्त झाली.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आयसर थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन जोरदार आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की गाडीचा पुढील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला.
या भीषण अपघातात वेंकांना कसंणा ईसलावत (वय ५५) आणि याकया रामलू मलाला (वय ५०) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघेही तेलंगणातील महिबुबाबाद येथील रहिवासी आहेत.
अपघातानंतर दोन्ही जखमी गाडीतच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले.
त्यानंतर त्यांनी तत्काळ सावनेर पोलिसांना माहिती देत आपत्कालीन मदत मिळवून दिली. जखमींना तातडीने सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे रेफर केले आहे.
या अपघातामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सावनेर परिसरातील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. वेग, थकवा आणि दुर्लक्ष हीच अपघातामागची प्रमुख कारणे ठरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. सध्या दोन्ही जखमींवर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत.



