Chhatrapati Sambhaji NagarcitynewsLatest NewsMaharashtra

अंमळनेर हादरलं! महिलेच्या घरात घुसून विनयभंग; ‘संबंध ठेव, नाहीतर मुलाला मारून टाकीन’ अशी धमकी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अंमळनेर येथे एका ३८ वर्षीय महिलेच्या घरात घुसून विनयभंग करत जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा दबाव टाकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विरोध केल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मजुरी करून उदरनिर्वाह करत असून त्या आपल्या मुलासोबत अंमळनेर येथे वास्तव्यास आहेत. दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी खलील नबाब पठाण हा महिलेच्या राहत्या घरी जबरदस्तीने शिरला.

घरात घुसल्यानंतर आरोपीने महिलेला जबरदस्तीने संबंध ठेवण्याची मागणी करत अश्लील प्रस्ताव दिला. “तू माझ्यासोबत संबंध ठेव, मग तुला त्रास देणार नाही… तुला नवरा नाही, मी तुझा सांभाळ करीन,” असे म्हणत आरोपीने तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महिलेने आरोपीच्या या कृत्याला ठाम विरोध केला असता, आरोपीने तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे महिला प्रचंड घाबरली असून घटनेनंतर त्यांनी तातडीने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी खलील नबाब पठाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे अंमळनेर परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपींवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महिलांनी अशा प्रकारच्या धमक्या किंवा छळ सहन न करता तात्काळ पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे. वेळेत दिलेली तक्रार आणि तातडीची कारवाईच अशा गुन्ह्यांना आळा घालू शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button