citynewsLatest NewsMaharashtraPune

पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! वंदे भारतचा डबा घसरल्याने ८ गाड्या रद्द, पुणे स्टेशनवरून एकही लोकल धावणार नाही

पुणे रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरल्याने आज पुणेकर प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या घटनेमुळे पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या तब्बल ८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, आज पुणे स्टेशनवरून एकही लोकल ट्रेन धावणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ही घटना सोमवारी रात्री घडली. मुंबई–सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (क्र. 22225) पुणे स्थानकात प्रवेश करत असताना सुमारे ७.३० वाजता सी-१५ कोचचा पुढील ट्रॉली भाग ‘डायमंड क्रॉसिंग’वरून घसरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक गाड्या २ ते ५ तास उशिराने धावत आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, पुणे स्टेशनवर सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंग आणि डायमंड क्रॉसिंग बदलाच्या कामादरम्यान हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घसरलेला डबा हटवून ट्रॅक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले असून काही मार्गांवरील रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे.

दरम्यान, पुणे–लोणावळा लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत एकही लोकल पुणे स्टेशनवरून सुटणार नाही. या सर्व लोकल गाड्या शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार असल्याने पुणे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या ८ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, पुणे–सीएसएमटी, पुणे–निजामुद्दीन, सीएसएमटी–कोल्हापूर, सीएसएमटी–बंगळुरू यांसारख्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. काही गाड्या रिशेड्युल करण्यात आल्या असून प्रवाशांना रेल्वे स्थानकावर मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनचा डबा पहिल्यांदाच पुणे स्थानकात घसरल्याने रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेने रेल्वे प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button