विदर्भ तापतोय! अकोला 46.9°C वर, अमरावती- वर्ध्यातही विक्रमी उष्णता; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

विदर्भात उन्हाळ्याने भीषण रूप धारण केलं असून तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठलाय. अकोला येथे तब्बल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हा एप्रिलमधील मागील काही वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरलाय. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
विदर्भातील उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अमरावती येथे तापमान 46.8°C, तर वर्धा मध्ये 46.4°C पर्यंत पोहोचलं आहे. विशेष म्हणजे वर्ध्यात तब्बल 30 वर्षांनंतर एवढं उच्च तापमान नोंदवलं गेलं आहे.
अकोल्यात सलग तीन दिवस तापमान 45 अंशांच्या वर राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 2019 मध्ये एप्रिल महिन्यातील 47.7°C हा विक्रम होता, आणि यंदा पुन्हा तापमान त्या पातळीच्या जवळ पोहोचल्याचं दिसत आहे.
अकोल्याचे मागील काही दिवसांचे तापमान
- 19 एप्रिल – 45°C
- 20 एप्रिल – 43.2°C
- 21 एप्रिल – 43.6°C
- 22 एप्रिल – 43.7°C
- 23 एप्रिल – 44.3°C
- 24 एप्रिल – 45°C
- 25 एप्रिल – 45.6°C
- 26 एप्रिल – 46.9°C
विदर्भातील इतर शहरांतील तापमान :
- अकोला – 46.9°C
- अमरावती – 46.8°C
- वर्धा – 46.4°C
- यवतमाळ – 46.0°C
- नागपूर – 45.4°C
- चंद्रपूर – 45.0°C
- गडचिरोली – 44.6°C
- वाशिम – 44.6°C
- गोंदिया – 44.4°C
- ब्रह्मपुरी – 44.2°C
- भंडारा – 44.0°C
- बुलढाणा – 43.5°C
तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि स्वतःची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विदर्भात वाढती उष्णता नागरिकांसाठी मोठं आव्हान ठरत असून पुढील काही दिवस परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.



