citynewsInternational NewsLatest News

वॉशिंग्टनमध्ये गोळीबाराचा थरार; व्हाईट हाऊस डिनरमधून ट्रम्प यांना तातडीने बाहेर काढले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स असोसिएशन डिनर कार्यक्रमातून गोळीबाराच्या घटनेनंतर तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या हाय-प्रोफाईल कार्यक्रमादरम्यान अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. सीक्रेट सर्व्हिसच्या तातडीच्या कारवाईमुळे ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि कॅबिनेट सदस्य सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर सुरू असतानाच हॉटेलच्या मुख्य सुरक्षा तपासणी क्षेत्राजवळ एका सशस्त्र व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर गोळीबार झाला आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित सुमारे २,५०० हून अधिक पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. उपस्थित पत्रकार, मान्यवर आणि अधिकारी तात्काळ टेबलाखाली लपले, तर सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना त्वरित मंचावरून हटवून सुरक्षितस्थळी हलवले.

सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी क्षणार्धात कारवाई करत संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, संशयिताकडे शॉटगन, हँडगन आणि काही धारदार शस्त्रे होती. गोळीबारात एका सीक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्याला जवळून गोळी लागली, मात्र बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्यांचा जीव वाचला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनेनंतर व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी होता. अशा घटनांनी लोकशाहीला घाबरवता कामा नये.” त्यांनी सीक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांच्या तातडीच्या आणि शौर्यपूर्ण कारवाईचे कौतुक केले. तसेच हा कार्यक्रम पुढील ३० दिवसांत पुन्हा आयोजित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर वॉशिंग्टनमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, कॅबिनेट सदस्य आणि शेकडो वरिष्ठ पत्रकार उपस्थित असलेल्या कार्यक्रमात सुरक्षा भेदली गेल्याने अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. तपास यंत्रणा सध्या हल्लेखोराच्या हेतूचा आणि सुरक्षा त्रुटींचा सखोल तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button