तापी नदीची लूट उघड! सोनाबर्डी घाटावर हजारो ब्रास रेतीचा महाघोटाळा?
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. तापी नदीच्या पात्रातून अधिकृत परवानगीपेक्षा अनेक पटींनी जास्त रेती उपसली जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त होत असून, सोनाबर्डी घाटावर हजारो ब्रास रेतीचा महाघोटाळा उघडकीस आल्याची चर्चा रंगली आहे. प्रशासनाच्या धडक कारवाईनंतर रेती माफियांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमेवरील जीवनवाहिनी मानली जाणारी तापी नदी सध्या रेती माफियांच्या विळख्यात सापडल्याचं चित्र आहे. धारणी तालुक्यातील सोनाबर्डी घाटावर गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत नोंदीनुसार या घाटावर केवळ ४ हजार ब्रास रेती उत्खननाची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात १० ते १५ हजार ब्रासपर्यंत रेती उपसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, कंत्राटदाराकडून अधिकृत नोंदीत केवळ १ हजार ब्रास रेती उपसल्याचे दाखवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. परवानगी, प्रत्यक्ष उत्खनन आणि अधिकृत नोंदीतील या मोठ्या तफावतीमुळे महसूल विभागालाच मोठा आर्थिक फटका बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली IAS अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी रात्रीच्या वेळी गुप्त छापा टाकत या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याची माहिती आहे. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पोकलँड, जेसीबीसारख्या अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने सुरू असलेले उत्खनन रंगेहात पकडण्यात आले. यामुळे रेती माफियांचा मोठा कारभार उघड झाला आहे.
इतकंच नाही, तर महाराष्ट्रातून अवैधरित्या उपसलेली रेती थेट मध्यप्रदेशातील देडतलाई पोलीस चौकीसमोर डंप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. यामुळे केवळ अवैध उत्खननच नव्हे, तर राज्याच्या महसुलावर थेट डाका टाकला जात असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “रेती माफियांना कोणाचा वरदहस्त आहे?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, धारणी तहसील कार्यालयाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तहसीलदार प्रदीप शेवाळे गेल्या चार वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने आणि बदली होऊनही न हलल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांमुळे वातावरण आणखी तापलं असून, आता प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तापी नदीची ही उघड लूट थांबवण्यासाठी प्रशासन कठोर कारवाई करणार का, की रेती माफियांना पुन्हा अभय मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
तापी नदीवरील या कथित महाघोटाळ्यानंतर आता प्रशासनाच्या कारवाईची खरी परीक्षा सुरू झाली आहे.



