citynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

धामणगाव RPFची तत्परता! हरवलेला 66 हजारांचा लॅपटॉप महिला प्रवाशाला सुरक्षित परत

धामणगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाचा हरवलेला महागडा लॅपटॉप सुरक्षित परत मिळाल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल संजय बोरुडे यांच्या तत्परतेमुळे ही मौल्यवान वस्तू काही तासांतच सुरक्षितपणे मालकिणीकडे परत पोहोचली.

२५ एप्रिल २०२६ रोजी धामणगाव रेल्वे स्थानकावरील आरपीएफ पोस्टला रेल मदत संदेश प्राप्त झाला. ट्रेन क्रमांक १२६५५ मधील बी-१ कोचच्या बर्थ क्रमांक २२ वर एका महिला प्रवाशाची लॅपटॉप बॅग राहिल्याची माहिती मिळाली. संबंधित महिला प्रवासी बडनेरा स्थानकावर उतरल्याचे समजताच हेड कॉन्स्टेबल संजय बोरुडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित डब्यात जाऊन तपासणी सुरू केली.

तपासणीदरम्यान बर्थ क्रमांक २२ जवळ ग्रे रंगाची लॅपटॉप बॅग आढळून आली. बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये एचपी कंपनीचा सिल्वर रंगाचा लॅपटॉप सुरक्षित अवस्थेत मिळून आला. त्यानंतर संबंधित महिला प्रवाशाशी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. लॅपटॉपची खात्री झाल्यानंतर तो सुरक्षितपणे आरपीएफ ठाण्यात जमा करण्यात आला.

महिला प्रवाशाच्या विनंतीनुसार, तिचे नातेवाईक मंदार मोरे यांना आरपीएफ ठाण्यात बोलावण्यात आले. आवश्यक पंचनामा आणि कागदपत्रांची पूर्तता करून लॅपटॉप व बॅग त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या लॅपटॉपची किंमत तब्बल ६५ हजार ९९९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदाबाद येथील महिला प्रवासी आसिता माखीजा यांनी आरपीएफच्या तत्पर आणि प्रामाणिक कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले. हेड कॉन्स्टेबल संजय बोरुडे यांनी यापूर्वीही अनेक प्रवाशांचा हरवलेला ऐवज शोधून परत मिळवून दिल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रेल्वे प्रवासात हरवलेली वस्तू परत मिळणे दुर्मिळ मानले जाते… मात्र धामणगाव RPFच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा प्रवाशांचा विश्वास दृढ झाला आहे… कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित असल्याचं या घटनेतून अधोरेखित झालं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button