“लग्नाच्या आनंदावर विरजण; भंडाऱ्यात वऱ्हाड्यांच्या व्हॅनला ट्रकची भीषण धडक, ५ ठार – ४ गंभीर”

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या व्हॅनला ट्रकची जोरदार धडक बसून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अड्याळजवळ घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे.
गुरुवारी रात्री सुमारे ९:४५ वाजताच्या सुमारास अड्याळ गावालगत सौंदड पुनर्वसन परिसरात हा भीषण अपघात घडला. अड्याळ येथील सुदर्शन नान्हे यांचे लग्न कोंढा येथे पार पडले होते. समारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाडी मंडळी व्हॅनमधून परतत होती. पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या फेरीत प्रवासी आणण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने व्हॅनला जोरदार धडक दिली.
या समोरासमोरच्या धडकेत व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातात श्वेता नगरे (१६), प्रभाकर चाचरकर (४८), मुन्नी चाचरकर (४३), नयना नगरे (१८) आणि दुर्गा नगरे (४२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोहम गेडाम आणि उमेश सोनवणे यांच्यावर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच रक्षा खेडकर आणि स्नेहा नान्हे यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
लग्नाच्या आनंदातून परतताना अचानक काळाने झडप घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



