“कर भरा आणि बक्षीस जिंका! धामणगाव नगरपरिषदेकडून लकी ड्रॉ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद”

धामणगाव रेल्वे येथे नगरपरिषदेकडून नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला आहे. पाणीपट्टी आणि विविध कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नगरपरिषदेमार्फत पाणीपुरवठा विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या योजनेची संकल्पना पाणीपुरवठा सभापती विलास बुटले यांची आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड रोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
लकी ड्रॉ प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी चिठ्ठ्या लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या. विजेत्यांना फ्रिज, टीव्ही, कुलर, शिवण मशीन, कुकर, मिक्सर आणि प्रेस यांसारखी उपयुक्त घरगुती उपकरणे देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कर वेळेवर भरण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढला आहे. परिणामी, पाणीपट्टी आणि इतर कर वसुलीतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
यावेळी नगराध्यक्षांनी नागरिकांना पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांमध्ये करभरण्याची सवय रुजवण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा ठरला असून, भविष्यातही अशा लोकहिताच्या योजना राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.



