“धामणगाव रेल्वेत सुरक्षा वाढणार; ९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रकल्पाचा शुभारंभ”

धामणगाव रेल्वे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी तब्बल ९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दत्तापूर पोलीस स्टेशन येथे नगराध्यक्ष डॉ. अर्चना रोठे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे विधिवत पूजन करून सुरुवात करण्यात आली.
शहर अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे हा पुढाकार घेतला आहे. प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे बसवून संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था उभारली जाणार आहे. या कार्यक्रमाला दत्तापूर, मंगरूळ दस्तगीर आणि कुऱ्हा पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, चोरी, अपघात आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे हाताळणे शक्य होणार आहे. संशयित हालचालींवर देखील बारकाईने नजर ठेवता येणार असल्याने पोलीस यंत्रणेला मोठी मदत होईल.
नगराध्यक्ष डॉ. अर्चना रोठे यांनी सांगितले की, नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहर सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या निर्णयामुळे धामणगाव रेल्वे ‘स्मार्ट आणि सुरक्षित शहर’ बनण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पुढे टाकत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



