AmravaticitynewsLatest NewsLocal NewsMaharashtra

“स्वच्छतेच्या दाव्यांचा फुगा फुटला! अमरावतीत सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था उघड”

अमरावती महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा फज्जा उडाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील गौतम नगर, समाधान नगर आणि भीमनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अत्यंत वाईट अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहराला स्वच्छ आणि हागणदारीमुक्त करण्याचे दावे होत असताना प्रत्यक्षात अनेक शौचालयांचे दरवाजेच गायब आहेत. पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. दुर्गंधी इतकी तीव्र आहे की नागरिकांना नाक दाबून जावं लागत असून, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मनपा प्रशासन आणि सफाई कंत्राटदार यांच्यात कोणताही समन्वय दिसून येत नाही. लाखो रुपयांचे कंत्राट दिले असतानाही प्रत्यक्षात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “कागदावर स्वच्छता, प्रत्यक्षात घाण” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. दरवाजेविना शौचालयांचा वापर करणे धोकादायक ठरत असून, नागरिकांमध्ये भीती आणि नाराजी वाढत आहे. एकीकडे मनपा प्रशासन स्वच्छ शहराचे दावे करत असताना, दुसरीकडे या भागातील वास्तव प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

नागरिकांनी तात्काळ साफसफाई, पाणीपुरवठा आणि दुरुस्ती करण्याची तसेच दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवणाऱ्या या निष्काळजीपणावर आता तरी प्रशासन जागं होणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button