दिल्लीतील धक्कादायक गुन्हा; आयआरएस अधिकाऱ्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी माजी नोकर अटकेत

दिल्लीतील आयआरएस अधिकाऱ्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. राहुल मीणा (वय २३) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील अलवरचा रहिवासी आहे. त्याला दिल्लीतील द्वारका परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या कुटुंबात पूर्वी नोकर म्हणून काम करत होता. बुधवारी पहाटे त्याने घरात घुसून तरुणीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. तसेच, खून करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपी एका हॉटेलमध्ये लपून राहत होता. पोलिसांनी तपासादरम्यान त्याला शोधून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात आरोपी ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाधीन असल्याचे आणि मोठ्या कर्जात बुडाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर त्याने हा गुन्हा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, खून आणि चोरीचे गंभीर गुन्हे नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.



